* एक महिन्यात 1.72 लाख कोटी जमा
* महाराष्ट्रातून सर्वाधिक कर
नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी भर पडली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये होते. यात महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे.
1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर ऑक्टोबर 2023 मधील जीएसटी संकलन हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 च्या तुलनेत जीएसटी संकलनात 13 टक्के वाढ झाली आहे.
अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर 2023 साठी जीएसटी संकलन डेटा जारी केला आहे, त्यानुसार ऑक्टोबरमध्ये 1,72,003 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये 30,062 कोटी रुपये सीजीएसटी, 38,171 कोटी रुपये एसजीएसटी, 91,315 कोटी रुपये आयजीएसटी आणि 12,456 कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत.
देशातून सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रातून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून 58,057 कोटींचा जीएसटी जमा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, दुसऱ्या स्थानावर गुजरात राज्य आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये 24, 005 कोटींची जीएसटी जमा झाला. तर, तामिळनाडू 23 हजार 661 कोटींचा जीएसटी वसूल झाला. कर्नाटक राज्यातून ऑक्टोबर महिन्यात 23,400 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला.
वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात सरासरी जीएसटी संकलन 1.66 लाख कोटी रुपये आहे, जे 11 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 13 टक्के अधिक आहे. देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या महसुलात 13 टक्के वाढ झाली आहे.
सरकारने सीजीएसटीमध्ये 42,873 कोटी रुपये तर आयजीएसटीमध्ये 36,614 कोटी रुपये एसजीएसटी म्हणून दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला सीजीएसटीमधून 72,934 कोटी रुपये, तर राज्यांना 74,785 कोटी रुपये एसजीएसटीमधून मिळाले.
या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1,87,035 कोटी रुपये होते, जे विक्रमी उच्चांक आहे. यानंतर मे ते सप्टेंबर दरम्यान थोडी घसरण झाली. सप्टेंबर 2023 मध्ये जीएसटी संकलन 1,62,712 कोटी रुपये होते. ऑक्टोबर 2022 मध्ये जीएसटी संकलन 151,718 कोटी रुपये होते.