ठाणे: दरवर्षीच्या उन्हाळ्यात जंगलांना आगी लागण्याच्या घटना वाढीस लागल्या असल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील येऊर रेंजमध्ये वन विभागाने शास्त्रीय पद्धतीने ‘फायर लाईन’ आखल्या आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात येऊरमधील जंगलातील आगीच्या घटना फार कमी झाल्या असून, फायर लाईन, वन कर्मचारीमार्फत गस्त आणि जनजागृतीमुळे जंगलाचे नुकसान न होता मोठा फायदा झाला आहे.
यासाठी महत्वाची सुरक्षा घेतानाही येऊरच्या जंगलात वन विभाग अन्य भागांचाही काळजी घेत आहे. जंगलात आग लागलीच तर ती पसरणार नाही यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातील येऊर रेंजमध्ये वन विभागाने शास्त्रीय पद्धतीने ‘फायर लाईन’आखल्या आहेत. याच लाईन तेथील ‘फायर लाईन’ महत्वाची भूमिका बजावत आहे, अशी माहिती येऊर येथील वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के दिली.
हिवाळा संपल्यावर जंगलातील हिरवाई कमी होते आणि तेथील परिसर रखरखाट झालेला दिसतो. उजाड जंगलात मोठ्या प्रमाणात गवत, झाड, झुडुपे सुकलेल्या अवस्थेत असतात. उन्हात झाडांच्या घर्षणाने काहीवेळा नैसर्गिक आग लागते. पण, अशा नैसर्गिक आगी लागण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. माणसांकडून जंगलात आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे.
अशावेळी मानवी छोटी चूक मोठ्या वणव्यात पसरते. जंगलातील आगीवर नियंत्रण करण्यासाठी ‘फायर लाईन’ जंगलाचे सुरक्षा कवच असते. एका वनाच्या पट्ट्यात लागलेली आग दुसरीकडे पसरणार नाही यासाठीच वन विभागाच्या येऊर परिक्षेत्रातील फायर लाईन आखल्या आहेत.
डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत जंगलामध्ये साधारण सहा मीटर अणि बारा मीटर रुंद अशा पद्धतीने जागेतील वाढलेली झुडूपे व गवत काढले जाते. जंगलातील महत्वाच्या जागेत शेकडो किलोमीटर लांब अशा पद्धतीने वाढलेले गवत, झुूडूपे काढली जातात. एखादवेळेस जंगलात आग लागल्यास ‘फायर लाईन’ मुळे आगीची झळ जास्त दूरपर्यंत पसरत नाही, असे श्री. सोनटक्के यांनी सांगितले.
उन्हाळ्यात आगीच्या घटना रोखण्यासाठी येऊर मधील जंगलात र्फायर लाईन ठिकठिकाणी आखली आहे. तसेच वन कर्मचारी अधिकाऱ्यांमार्फत वणवा लागू नये याकरिता दिवस रात्र गस्त करण्यात येते. त्या सोबतच येथील आदिवासी पाड्यांमध्ये विभागामार्फत जनजागृती केली जाते. त्यामुळे पाड्यातील आदिवासींचे जंगल सुरक्षेसाठी सहकार्य मिळत असते.-गणेश सोनटक्के (वन परिक्षेत्र अधिकारी येऊर)
जंगलात फिरण्यासाठी अनेक जण जातात. काहीवेळा खान पान करतात. पेटलेली सिगारेट विडी काडीची ठिणगी गवतावर पडून आग लागण्याची शक्यता अधिक असते. उन्हाळ्यात सुकलेला पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात असून, छोटी आग रौद्र रूप धरते.