१३ ते १७ मजल्यांवरील कुटूंबांचा थरकाप
ठाणे: घोडबंदर रोड, कासारवडवली येथील एका इमारतीमध्ये १३ ते सतराव्या मजल्यापर्यंत डक्टमधील इलेक्ट्रिक केबलला टाकावू लाकडी वस्तू तसेच कचऱ्यामुळे आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत अडकलेल्या ७० ते ७५ जणाची ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यातही यश आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आनंदनगर, कासारवडवली येथे सुदर्शन स्काय गार्डन या सोसायटीच्या लीलियम इमारतीच्या तेरा ते सतराव्या मजल्यापर्यंत आग लागल्याची घटना मंगळवारी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ही माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली. आगीमुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले होते. त्यातच १३ ते १७ मजल्यावरील सुमारे ७५ रहिवाशी या इमारतीमध्ये अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना तातडीने सुखरूप बाहेर काढून त्यांची सुटका केली. या आगीवर तासाभराच्या अंतराने नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी एक फायर वाहन आणि एक – रेस्क्यू वाहन पाचारण केले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.
माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत इमारतींची बांधकामे अर्धवट स्थितीत असून काही कुटुंबेही इमारतीत राहण्यास आली आहेत. या इमारतींमध्ये विकासकाने बांधकाम साहित्य डंप करून ठेवले असून मीटर बॉक्स आणि विजेच्या वायरींची अवस्थाही बिकट झालेली आहे. यामुळे आगीच्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे. अशा इमारतींचा शोध घेऊन विकासकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.