कल्याण: कल्याण-डोंबिवली मनपाच्या उंबर्डे येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरात धुराचे लोट उसळल्याची घटना घडली.
उंबर्डे कचरा प्रकल्पात कचऱ्याने पेट घेतल्याची घटना दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात धुराचे लोट उसळले. वातावरणातील उष्णता आणि धुराचे लोट उसळल्याने परिसरातील वातावरण धुरमय झाले. आगीची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. तीन तासाच्या अथक प्रयत्नांतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन विभागाला यश आले आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी कुलिंग आँपरेशन सुरू केले. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचे मुख्य अग्निशमन आधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले.