ठाणे: बिघाड असलेली रिकामी बस गायमुख येथून मुलुंड डेपो येथे नेताना, त्या बसच्या मागील बाजूच्या उजव्या टायरचे ब्रेक डिस्क गरम होऊन टायरला आग लागल्याची घटना माजिवडा ब्रीजखाली तिरंग्याच्या बाजूला गुरुवारी रात्री सव्वा अकरा ते साडेअकराच्या सुमारास समोर आली.
यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून त्या आगीवर काही मिनिटांत नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
बेस्ट चालक एकनाथ दहिफळे आणि वाहक संतोष बनसोडे हे दोघे बसमध्ये बिघाड झाल्याने बस रिकामी करून गायमुख येथून मुलुंड डेपोला निघाले होते. माजीवडा ब्रीज खाली तिरंग्याच्या बाजूला आल्यावर बसच्या मागील बाजूच्या उजव्या टायरचे ब्रेक डिस्क गरम होऊन टायरला आग लागली.
धूर येत असल्याचे पाहून तातडीने शहर वाहतूक पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सांगितले. तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविले. साधारणपणे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.