कोपरी पूर्वेच्या उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाला अखेर मुहूर्त

ठाणे : बारा बंगलामार्गे ठाणे कोपरी पूर्वहून नौपाड्याच्या दिशेने जाणा-या उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाच्या कामांना मंगळवारी अखेर ‘मुहूर्त’ मिळाला.

नौपाड्याच्या दिशेने जाणा-या रस्त्यांवर मोठ्ठे खड्डे पडल्यामुळे वाहनांना विशेषत: लहान आणि दुचाकी वाहनांना वेग कमी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पावसाळयात थातूरमातूर कामे केल्यामुळे अनेक दुचाकी घसरुन पडल्याच्या घटना झाल्या होत्या. तरीदेखील हा पूल बंद न ठेवता सुरुच होता. पाऊस गेल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामे करण्याचे नियोजन महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आखले होते. मंगळवारपासून त्याचा आरंभ झाला. पुढे २०० मीटर अंतरावर ब्रीजच्या (अ‍ॅप्रोच) रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात होणार आहे.

हरीनिवास, नौपाड्यातून कोपरी गाव आणि कोपरी कॉलनी येथे जाण्या-येण्यासाठी महापालिकेने दोन  उड्डाणपूल बांधले आहेत. कोपरीकडे जाणारा पूल नौपाडा पोलिस ठाण्यापासून सुरु होतो आणि पोलिस ठाण्याकडे येणा-या पुलाची सुरुवात पंप हाऊस/दत्ताजी साळवी उद्यानापासून सुरु होते. सोमवारी पहिल्या टप्प्यात नौपाडा पोलिस ठाण्याचा  प्रारंभ होतो, तेथून कामाला सुरुवात झाली आहे. कोपरीहून येणा-या रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे आणि अत्यंत खराब झालेल्या रस्त्यावरील मास्टिक खरवडून काढण्यास सुरुवात झाली.

आधीच्या मास्टिकची कामे संपूर्ण झाल्यानंतर काँक्रिट रस्ता तयार करण्याची पूर्वतयारी करण्यात येतील. रस्ता काँक्रिट करण्यासाठी सात दिवस ‘क्युरिंग’ करण्यात येणार आहे. नौपाडा पोलिस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावरही बरेच खड्डे असून, हा रस्ता सपाट करण्यासाठी त्याची डागडुजी हाती घेण्यात येतील. या सर्व कामांना एक महिन्यांचा अवधी लागणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने ‘ठाणेवैभव’ दिली.

या रस्त्यांची सर्व कामे झाल्यानंतर आणि त्यावरुन वाहने जाण्यास सुरुवात केल्यावर नौपाडा ते कोपरीकडे जाणा-या रस्त्याचेही काँक्रिटीकरणाला प्रारंभ होणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.