अखेर आईस फॅक्टरीजवळचा `टीएमटी’चा थांबा पुन्हा बसविला

भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडून परिवहन सभापतींचे आभार

ठाणे : नौपाड्यातील आईस फॅक्टरीजवळचा `टीएमटी’चा बसथांबा काही समाजकंटकांनी मध्यरात्रीतच गायब झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर, `टीएमटी’ प्रशासनाने जनभावनेची दखल घेत पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी `टीएमटी’चा थांबा बसविला आहे. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे महापालिका परिवहन समितीचे (टीएमटी) सभापती विलास जोशी यांचे आभार मानले आहेत.

नौपाड्यातील गोखले रोडवरील आईस फॅक्टरी येथे अनेक वर्षांपासून टीएमटी बसचा थांबा आहे. या थांब्यावर शालेय विद्यार्थी, रहिवाशी आणि नागरिकांची चढ उतार होते. नौपाड्यात ये-जा करण्यासाठी हा थांबा महत्वाचा होता. या ठिकाणचा थांबा गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री गायब करण्यात आला होता. या घटनेची माहिती काही नागरिकांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना दिली. त्यांनी तातडीने परिवहन प्रशासनाकडे आवाज उठवून पूर्वीच्याच ठिकाणी थांबा बसविण्याची आग्रही मागणी करून, सीसीटीव्हीद्वारे समाजकंटकांचा शोध करून कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी `टीएमटी’ प्रशासनाने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर कॅडबरी जंक्शनच्या पुलाखाली पळविलेला बसथांबा सापडला होता. या प्रश्नावर जनभावनाही तीव्र होत्या. त्याची दखल घेत प्रशासनाने आज दुपारी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी बसथांबा बसविला.

या संदर्भात जनभावनेची दखल घेतल्याबद्दल सभापती विलास जोशी यांचे आभार मानले. तसेच या प्रकरणात बसस्टॉपमागील मालमत्ताधारकाचे वा कोणत्या विकासकाचे हितसंबंध आहेत, याची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. यापूर्वी ए. के. जोशी शाळेजवळ असलेला टीएमटीचा थांबा सुमारे अडीच वर्षांपूर्वी दोन वेळा चोरीला गेला असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी श्री. वाघुले यांनी तक्रार केल्यानंतर पुन्हा थांबा पूर्वीच्याच ठिकाणी बसविण्यात आला होता. आता आईस फॅक्टरीजवळचा थांबाही पुन्हा बसविण्यात आला आहे.