अभूतपूर्व यशामुळे महायुतीसाठी सकारात्मक वातावरण तीन महिन्यांत निवडणुका लागणार?
ठाणे : राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचा फायदा उचलण्यासाठी मागिल काही वर्षे रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल राज्य सरकार वाजविण्याच्या तयारीत आहे. लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील दहा महापालिका आणि नगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद येथे लोकप्रतिनिधी नाहीत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थेट अधिकाऱ्यांना समस्या सांगाव्या लागत आहेत. परिणामी त्यांना अडचणी भेडसावत आहेत. त्यामुळे महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर कराव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. परंतु आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद विजय मिळाला आहे. त्याचा फायदा मिळवण्यासाठी राज्य सरकार पुढील दोन ते तीन महिन्यांत नगरपालिका, महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची श्यक्यता आहे.
राज्य सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, मीरा-भाईंदर आणि भिवंडी या सहा महापालिका ठाणे जिल्हा परिषद, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषद यांच्या निवडणुका मागिल दोन ते सहा वर्षापासून स्थगित आहेत. त्यांचा कारभार सध्या प्रशासकाच्या ताब्यात आहे.