ठाणे: ठाण्यात भाजप जिल्हाध्यक्षपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पक्षाने जाहिर केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संदिप लेले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या पदासाठी अनेक नावे चर्चेत होती. त्यामुळे जुने विरुद्ध आयात झालेले नवीन शिलेदार असा संघर्ष सुरू होता. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विद्यार्थीदशेपासून संघ परिवाराशी घट्ट नाळ जोडून असलेल्या संदिप लेले यांनी बाजी मारली आहे. त्यांनी यापूर्वीही हे पद सांभाळले होते. पण यासर्व घडामोडीमध्ये पुन्हा आपल्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळेल या अपेक्षेत असलेल्या संजय वाघुले यांची निराशा झाली आहे.
भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता जिल्हाध्यक्षपदांची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळयासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देण्याचा प्रयत्न यावेळी भाजप नेतृत्वाने केले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदिप लेले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी, भिवंडी जिल्हाध्यक्षपदी रविकांत सावंत, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्षपदी दिलीप जैन, नवी मुंबई, जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील, कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब आणि उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी राजेश वधारिया यांची नेमणूक केली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जुलै २०२३ साली ठाण्यातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. दोन वर्षातील आपल्या कारकिर्दीत त्यांनी पक्षाला अपेक्षित कामगिरी केली. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा आपल्या हाती येईल अशी त्यांना अपेक्षा होती. यावरून गेल्या महिन्याभरापासून पक्षांतर्गत स्थानिक पातळीवर खलबते सुरू होती. जुन्या जाणत्यांचा एक गट त्यातही समर्थकांचा वेगळा गट आणि इतर पक्षातून आलेल्यांचा एक गट अशी रस्सीखेच सुरू होती. निष्ठावंतांनाच संघटनात्मक पद मिळावे असा सूरही आळवला गेला. यामध्ये संदिप लेले यांच्या नावाचीही चर्चा होती.
महाविद्यालयीन काळापासून संदिप लेले संघ परिवाराशी जोडले गेले होते. अभाविपचे सक्रीय कार्यकर्ते होते. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. २०१४ साली शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर त्यांनी कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून एकनाथ शिंदे यांना कडवी झुंज दिली होती. त्यावेळी लेले यांना सुमारे ४८ हजार मते मिळाली होती. एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक जिंकली पण या दोन्ही उमेदवारांमध्ये ३० हजार मतांचा फरक होता. संजय वाघुले यांच्या नियुक्तीआधी संदिप लेले ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी होते. आता एक टप्प्याच्या विश्रांतीनंतर त्यांना पुन्हा ही संधी मिळाली आहे. संदिप लेले शांत स्वभावाचे असले तरी शिवसेनेविरोधात प्रसंगी आक्रमक भूमिका घेतात. स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. मात्र आगामी महापालिका निवडणुकीची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे शहरासाठी योग्य अध्यक्षाची निवड केली असून ठाणे शहरातील जुने-जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी श्री.लेले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील, आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शनही असल्याने आगामी निवडणुकीत याची प्रचिती निश्चित येईल, असा विश्वास जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते शैलेश शर्मा यांनी व्यक्त केला.