अखेर तानसा अभयारण्यात ‘त्याला’ कॅमेऱ्याने केले कैद

बिबट्याचा वावर वाढू लागला

शहापूर : शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात बिबट्या असल्याचे फक्त बोलले जात होते. मात्र ते आता स्पष्ट झाले असून बिबट्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमे-यात कैद झाल्या आहेत.

तानसा अभयारण्यातील नियतक्षेत्रातील साखरोली कंपार्टमेंट नंबर 903 मध्ये वनरक्षक संतोष खंदारे यांना बिबट्याच्या पाऊलखुणा दिसल्या असता त्यांनी तानसा वन्यजीव विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ यांना माहिती दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत रमेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संतोष खंदारे यांना नर जातीच्या बिबट्याचे छायाचित्र टिपण्यात यश आले आहे. दरम्यान तानसा अभयारण्यात बिबट्याचे वास्तव्य आहेच यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

तानसा अभयारण्य क्षेत्रात झालेले बिबट्याचे दर्शन म्हणजे एक पर्वणी असून येथील त्याचे अस्तित्व म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यात भरच पडली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याच्या पिवळ्या अंगावर असलेले काळे ठिपके, लांबसडक शेपटी आणि सुदृढ शरीरयष्टी असलेल्या नर जातीच्या बिबट्याचे उत्कृष्टरित्या टिपलेले छायाचित्र पाहून मन आकर्षित होते.

तानसा अभयारण्य हे 304 किलोमीटर अंतरावर पसरले असून या अभयारण्यात 300 ते 350 पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. 250-270 झाडांच्या विविध प्रजाती आहेत. मात्र धक्कादायक म्हणजे वन्यप्राणी सर्वेक्षणात तानसाच्या जंगलात बिबट्या अथवा एखाद्या वाघाच्या पाऊलखुणा आढळून आल्याची नोंदच वन्यजीव विभागाकडे दिसत नसल्याने तानसाच्या जंगलात आता बिबटे उरले आहेत की नाहीत याबाबत शंका व्यक्त होत होती मात्र बिबट्याचे वास्तव्य असल्याचे आता निष्पन्न झाले आहे.

तानसा अभयारण्यात पट्टेरी वाघ असल्याची नोंद सन 1970 मध्ये करण्यात आली आहे. आत्ताही तानसा अभयारण्यात बिबट्याचे वास्तव्य सिध्द झाले आहे. दरम्यान बिबट्यापासून बचाव करण्यासाठी गाव-पाड्यांमध्ये प्रत्यक्षात जाऊन माहिती दिली जाते. फलक लावून जनजागृती केली जाते. या बिबट्याची पूर्ण वाढ झाली असून तो अन्न पाण्यासाठी सतत फिरत असतो. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. वन्य प्राण्यांना बाधा पोहचेल असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे वनपरीक्षेत्र अधिकारी रमेश रसाळ यांनी सांगितले.