आधुनिक तंत्रज्ञानाने तत्काळ खड्डे बुजवा – जिल्हाधिकारी

ठाणे : ठाणे शहर व जिल्ह्यातील वाहतुक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी तातडीने टास्क फोर्सची बैठक घेतली.

तत्काळ यंत्रणांनी पथकांची संख्या वाढवून पावसामुळे पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने बुजवावेत. आपल्या भागातील वाहतूक उपायुक्तांशी समन्वयातून वाहतूक कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी या बैठकीत दिल्या. पुढच्या आठवड्यात पुन्हा टास्क फोर्सची पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून त्याची दखल घेत आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने टास्क फोर्सची बैठक घेण्याचे निर्देश दिले.

खड्डे आणि सुरू असलेल्या विविध विकास कामांमुळे होणारी वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या वर्षी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. त्याची मॉन्सनपूर्व बैठक यावर्षी मार्चमध्ये घेण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याबाबत यंत्रणेला निर्देश दिले होते.

आज सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका आयुक्त, शहर अभियंता, ग्रामीण पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, एमएमआरडीए, एमएसआरडीए, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक शाखा उपायुक्त यांच्याशी संवाद साधत आढावा घेतला.

यावेळी श्री. नार्वेकर म्हणाले, ठाणे जिल्ह्यात जून मध्ये सुमारे ३० टक्के पाऊस झाला. मात्र जुलैच्या १५ दिवसात आतापर्यंत सलग पाऊस पडतोय आणि जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मिळत आला आहे. जुलैत आता पर्यंत सरासरीच्या सुमारे १९८ टक्के म्हणजे जवळपास दुप्पट पाऊस झाल्याचे त्यांनी सांगितले. अतिपावसामुळे महापालिका क्षेत्रातील, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. सध्या जिल्ह्याला पावसाचा येलो आणि ग्रीन अलर्ट मिळाला असून तात्काळ यंत्रणांनी खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा टास्क फोर्सची पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.