टीएमसीचे नाणे खणखणले; आरबीआय संघाला नमवले

ठाणे: ठाणेवैभव करंडक स्पर्धेच्या अ गटात झालेल्या उपांत्य सामन्यात ठाणे महापालिकेच्या (टीएमसी) संघाने आरबीआय संघाचा ७७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. विजयी संघाचा अरविंद पटेल सामनावीर ठरला.

दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा मान ज्येष्ठ क्रिकेटपटू मधुकर पंडित यांना देण्यात आला. नाणेफेक जिंकत टीएमसी संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र डावाची सुरुवात निराशाजनक झाली. विशाल रंगलानी शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी करताना अलसाद शेख याने ३३ धावा केल्या. नवव्या क्रमांकावर उतरलेल्या सौद मन्सुरीने दोन षटकार आणि दोन चौकारांसह ३५ धावा केल्या. राजेश भुजबळ याने नाबाद २८ धावांचे योगदान दिले. गोलंदाज असलेल्या अरविंद पटेल याने दोन षटकार आणि एक चौकार ठोकत आठ चेंडूंत १६ धावांचे बहुमोल योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, परंतु अवांतर १५ धावा आणि १६ दंड धावा यांच्या जोरावर ३४ षटकांत १७७ धावांपर्यंत मजल मारली. आरबीआय संघाकडून सोहन तळेकर याने २४ धावांत तीन गडी बाद केले.

टीएमसी संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना आरबीआय संघाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. अमेय दांडेकर याच्या २९ धावा आणि सोनू यादवच्या १५ धावा वगळता इतर फलंदाजांनी टीएमसी संघाच्या गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या. अवघ्या २३.२ षटकांत आरबीआयचा संपूर्ण संघ १०० धावा करत तंबूत परतला. टीएमसीकडून शशिकांत कफम याने २१ धावा देत तीन बळी घेतले. तर अरविंद पटेल, अमित पांडे आणि संकेत यशवंते यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. अरविंद पटेल सामनावीर ठरला.