खडवली क्रॉसिंगजवळील घटना
भिवंडी: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील खडवली गावाच्या क्रॉसिंगवर कंटेनर आणि प्रवासी वाहतूक जीपचा मंगळवारी सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघातात जीपमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भिवंडीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून या अपघात प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चिन्मयी शिंदे (१५), रिया परदेशी, चैताली पिंपळे (२७), संतोष जाधव (५०), वसंत जाधव (५०), प्रज्वल फिरके अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दिलीप विश्वकर्मा (२९), चेतना जसे (१९), कुणाल भामरे (२२) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त प्रवासी जीप ही पडघा गावातून प्रवासी घेऊन मुंबई-नाशिक महामार्गावरून खडवली रेल्वे स्थानकाकडे जात होती. याच दरम्यान महामार्गावरील खडवली फाट्यावर प्रवासी जिप क्र.एमएच ०४ ई १७७१ ही खडवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर क्रॉसिंग करत असतानाच, नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर क्र.एमएच ४८ टी ७५३२ ने प्रवासी जीपला जोरदार धडक दिल्याने प्रवासी जीप ५० ते ६० फूट अंतरावर उडत जाऊन चिखलात फेकली गेली. या भीषण अपघातात प्रवासी जीपचा चेंदामेंदा होऊन प्रवासी जिपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पडघा पोलीस ठाण्याचे पथक दाखल होऊन पंचनामा करत चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या अपघात प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. प्रवासी जीपच्या चालकासह तिघांवर भिवंडीतील मिल्लत नगरजवळील मायरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पडघा पोलिसांनी दिली.