भातखरेदी केंद्रे सुरूच झाली नाहीत
शहापूर: महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे दरवर्षी आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून भातासह भरड धान्यखरेदी केली जाते. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन देखील मेसेज आला नाही. तसेच भात खरेदी केंद्र सुरु व्हायला दोन महिने उलटल्यानंतरही ते सुरु न झाल्याने शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आपले भात खाजगी व्यापाऱ्यांना विकून कर्ज बाजारीतून आपली सुटका केली.
आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत योजने अंतर्गत सन २०२४-२५ या वर्षी मंजूर करण्यात आलेल्या भात खरेदी केद्रांपैकी फक्त दोनच खरेदी केंद्रे सुरु होती. ३१ मार्च ही खरेदीची शेवटची तारीख असून खरेदी केंद्रेच बंद असल्यामुळे खरेदी कशी होणार या चिंतेत शहापूर तालुक्यातील शेतकरी सापडला होता.
दरम्यान भात खरेदी होत नसल्याने तालुक्यातील नडगाव, शिरगांव, लेनाड, नेहरोली, डोळखांब, नांदगाव, किन्हवली आदी भागातील शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आपला अंदाजे दीड हजार क्विंटल भात खाजगी व्यापाऱ्यांना विकून आपल्यावर असलेले कर्ज फेडले आहे. मार्च अखेर असल्याने बँका तसेच सेवा सहकारी सोसायटी यांचे घेतलेले कर्ज वेळेत फेडले नाही तर जादा व्याजाची रक्कम भरावी लागली असती या भीतीने शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याला तब्बल दीड हजार क्विंटल भात विकला असल्याचे विदारक चित्र आहे.
माझ्या लागवडीच्या क्षेत्राची ऑनलाईन नोंदणी करुन दीड महिना उलटला तरी खरेदी केंद्रावर भात घेऊन येण्याचा मेसेज पडला नाही. त्यातच घरात भात ठेवल्याने पाखरे आणि उंदीर यांचा उपद्रव वाढला. शिवाय मार्च अखेर असून बँक व सोसायटी यांचे कर्ज वेळेत फेडणे गरजेचे होते. महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे नाईलाजास्तव आम्हाला खाजगी व्यापाऱ्याला भात विकावा लागला, असे शेतकरी यादव जागरे यांनी सांगितले.