नवी मुंबई : एपीएमसी बाजार समितीत काही गाळेधारक, बिगर गाळेधारक यांच्याकडून शेतकऱ्यांचे पैसे थकत असून ही रक्कम देण्यास व्यापारी चालढकल करत आहेत. अद्याप एक कोटीहून अधिक थकीत वसूल करून देणे बाकी आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार शेतमालाची विक्री झाल्यानंतर २४ तासात संबंधित व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे बंधनकारक असते. व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाची रक्कम न दिल्यास किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्यास त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार एपीएमसी प्रशासनाला आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावात विकून त्यांना योग्य मोबदला द्यावा याकरिता बाजार समितीने व्यापाऱ्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत. मात्र एपीएमसी बाजारातील व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे प्रकरणे निदर्शनास येत आहेत.
कांदा-बटाटा बाजारात सर्वाधिक तक्रारी होत्या. कांदा-बटाटा बाजारातील २०-२५ व्यापाऱ्यांकडून पाच कोटी थकबाकी होती, आता एक कोटी सहा लाख ७२,८२४ रुपये थकीत बाकी आहे.
आता ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्यानुसार संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावून ही प्रकरणे न्याय प्राधिकरणाकडे वर्ग केली असून त्याचा निकाल लागताच मालधनीना त्यांचे पैसे मिळणार आहेत, अशी माहिती कांदा-बटाटा मार्केटचे उप सचिव गोविंद शिंपले यांनी दिली.