कल्याण : रस्त्याचा मोबदला न मिळाल्याने कल्याणमधील गौरीपाड्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंतबदला मिळत नाही तोपर्यत येथे असलेल्या सोसायटीकडे जाणारा कच्चा रस्ता रोखण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर या ठिकाणी कडोंमपा प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता महापालिका अधिकारी, पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना आज घडली आहे.
यावेळी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांनी हातात दांडके घेऊन स्थानिक शेतकरी व विधवा महिलांना शिवीगाळ करून धमकावले असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून याबाबत त्यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे ब प्रभाग अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील वृदांवन सोसायटीकडे जाणाऱ्या डीपी रस्त्याचा टीडीआर अथवा मोबदला शेतकरी कुटुबीयांना मिळाला नसल्याने या रस्त्याबाबत हरकत आहे. सदर रस्ता न्यायप्रविष्ट असताना सोसायटीच्या मागील बाजूने पर्यायी रस्तासाठी जागा शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे. असे असतांना पालिकेचे ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी दबंगगिरी करीत पोलीस फाटा घेऊन आले असता बाचाबाचीचा प्रसंग निर्माण झाला. राजेश सावंत यांनी हातात दांडके घेऊन विधवा महिला व शेतकऱ्यांना शिवीगाळ व धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी आयुक्त यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केला असून निवेदनद्वारे “ब” प्रभागक्षेत्र आधिकारी यांच्या वर कारवाईची मागणी शुक्रवारी केली आहे.
गौरीपाडा येथे ब प्रभाग सहाय्यक आयुक्त राजेश सावंत आले असता, येथील शेतकरी महिलांनी याठिकाणी कशासाठी आले असा प्रश्न विचारला. त्यावेळी प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी हातात काठी घेऊन फिल्मी स्टाईलने महिलांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. विकासकाची सुपारी घेऊन शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी द्वारकानाथ म्हात्रे यांनी केला आहे.
या प्रभाग अधिकाऱ्यांना महिलांवर हात उचलण्याचा अधिकार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना कधी दिला असा सवाल यावेळी म्हात्रे यांनी विचारला.