जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती सुरू करावी; केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे आवाहन

मुरबाड : मुंबई व ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरातील बाजारपेठ लक्षात घेऊन, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काल येथे केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुरबाड तालुक्यातील नागाव येथील कृषी विज्ञान केंद्रात `विशेष किसान भागीदारी प्रार्थना हमारी’ अभियानांतर्गत शेतकरी मेळावा मंगळवारी पार पडला. या मेळाव्याला ऑनलाईन पद्धतीने नवी दिल्लीतून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात ही मोहीम राबविली जात असून, त्यात एक कोटींहून अधिक शेतकरी सहभागी होत आहेत. या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सहभाग घेण्याचे आवाहन राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

या वेळी आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, पंचायत समितीच्या सभापती स्वरा चौधरी, जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत, उल्हास बांगर, समता एफपीओचे संचालक बुधाजी बांगल, सरपंच चंद्रकांत हरड, उपसरपंच स्वाती हरड, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जगदाळे यांची उपस्थिती होती.

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवघ्या ५० किलोमीटरवर मोठ्या शहरातील बाजारपेठ उपलब्ध आहे. या ठिकाणचा ग्राहक कायमस्वरुपी जोडल्यास शेतकऱ्यांची प्रगती होईल. सध्या नैसर्गिक शेतीतील भाजीपाला, पिकांना पसंती मिळत आहे. त्यादृष्टीकोनातून पारंपरिक पद्धतीऐवजी तरुण शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे . तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतीसाठी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन राज्यमंत्री पाटील यांनी केले. अन्नामध्ये पोषक तत्त्वे वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिश पातुरकर, विद्यापीठाचे संचालक डॉ. अनिल बिकाने यांचीही उपस्थिती होती.