ठाणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या ठाणे जिल्हा केंद्रातर्फे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून ‘कौटुंबिक समस्या: समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शन केंद्र’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, पाचपाखाडी येथे सुरू करण्यात आले आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. दर शुक्रवारी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत केंद्रात समुपदेशन करण्यात येणार आहे.
या केंद्राचा प्रमुख उद्देश,कौटुंबिक समस्या असणाऱ्या गरजू महिलांना आणि कुटुंबांना योग्य ती मदत व कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देणे हा आहे. सदर केंद्र दर शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा केंद्रामध्ये कार्यरत असेल.
ठाणे जिल्ह्यासह राज्यात दहा ठिकाणी हे केंद्र सुरू केले आहेत. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून विधी सल्ला, साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून हे केंद्र ठाण्यात सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात शोषित, पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला देऊन समुपदेशन करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विस्कटलेला संसार एकत्र जोडण्यात येणार आहेत, असे सांगितले.
या प्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरचे ठाणे जिल्हा सचिव अमोल नाले, महिला समन्वयक माया कटारिया, कार्यकारिणी सदस्य आलोक ताम्हणकर, दर्शना दामले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, महिलाध्यक्ष सुजाता घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.