फेस डिटेक्शन मशीनमुळे ‘लेटलतिफांना बसणार दणका

भाईंदर : लेटलतीफ कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेत पालिका मुख्यालयासह प्रभाग कार्यालय व इतर कार्यालयात फेस डिटेक्शन मशीनद्वारे हजेरी नोंदविण्यात येणार असल्याने ‘लेटलतीफ व गायब राहणाऱ्या’ कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे.

२८ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील कोरोना महामारीतील बंधनामध्ये शिथिलता आणल्यानंतर शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्याबाबत परिपत्रक जाहीर करून अमंलबजावणी करण्याचे निर्देश दिले. कोरोना महामारीचा उद्रेक झाल्याने कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार मीरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयासह विविध कार्यालयात कार्यरत बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली होती. सदर मशीन बंद करण्यात आल्याने पालिकेतील लेटलतीफ कर्मचाऱ्यांनी पुन्हा पालिका कार्यालयात उशीरा हजर राहण्याची परंपरा सुरू केली. सकाळी ११ वाजेपर्यंत पालिकेत उपस्थित होऊन संध्याकाळी ५ किंवा ५-३० ला कार्यालयातून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना विभाग प्रमुखांची ‘मूक संमती’ असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे ‘आव जाव घर तुम्हारा’ काम करीत दरमहा हजारो रुपयांचे वेतन घेण्याची कामगिरी जोमात सुरू होती.

आयुक्त दिलीप ढोले यांनी शुक्रवार १ एप्रिल रोजी सकाळी १०-३० च्या सुमारास पालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रापासून ते चवथ्या मजल्यावरील लेखा विभागापर्यंत अचानक भेट देवून ‘लेटलतीफ’  कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. मात्र दोन आठवड्याचा कालावधी होत आला तरी लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्याने सदर झाडाझडती ही नुसतीच ‘हूल’ असल्याची चर्चा पालिका अधिकाऱ्यांमधे सुरू होती. लेटलतीफ कर्मचाऱ्यांना ‘लगाम’ लावण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन हजेरी’ सुरू करण्याच्या महाराष्ट्र शासन परिपत्रकाची अमंलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बायोमेट्रिक (अंगठा) हजेरी मशीन ऐवजी फेस डिटेक्शन मशीन लावण्याचा निर्णय आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. सदर मशीन पालिका मुख्यालयासह प्रभाग कार्यालय, अग्निशमन  विभाग कार्यालय, नगररचना विभाग, पालिका इस्पितळ अशा सर्व ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. या मशीनद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या उपस्थितीनुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार असल्याने आता लेटलतिफांना व लवकर घरी जाणाऱ्यांना चांगलाच फटका बसणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.