विकासकाकडून मागितली आठ कोटींची खंडणी

१० लाख स्वीकारताना तिघांना अटक

ठाणे: ईडी, सीबीआय, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसाकडे तक्रार करण्याची भीती दाखवून कळवा येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल आठ कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला ठाणे गुन्हे शाखेने सापळा रचून १० लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना रंगेहात अटक करून. ती रोख रक्कम जप्त केली आहे.

मनोहर बावडेकर (४७) सिद्धेश बेंडकोळी (३५) आणि एम्तियाज मोमीन (३१) असे अटक केलेल्या खंडणीखोर आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथील बांधकाम व्यावसायिकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. केशव हाइट्स इमारतीच्या मूळ मालकाच्या मृत्यूनंतर झालेल्या नोटरी व्यवहाराच्या आधारे त्रिकुटाने तक्रारदारांना विविध केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयीन कारवाईत अडकवण्याची धमकी देत होते. ही कारवाई थांबवण्यासाठी आणि दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्रिकुटाने प्रथम साडेचार कोटी, त्यानंतर संपूर्ण प्रकरण “निकाली काढण्यासाठी” आणखी चार कोटी रुपयांची मागणी केली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हे शाखा, घटक-१चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराला व्हॉइस रेकॉर्डर देऊन आरोपींसोबतचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. त्यामध्ये खंडणीची मागणी स्पष्टपणे नोंदवली गेल्यानंतर कारवाईची रणनीती आखण्यात आली.
३० जुलै २०२६ रोजी कळवा येथील केशव हाइट्समधील कार्यालयात आरोपी पहिला हप्ता म्हणून १० लाख रुपये स्वीकारण्यासाठी आले. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणार्धात कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण रक्कम जप्त केली.

या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्या तिन्ही आरोपींना ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या खंडणी रॅकेटमध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच अशा प्रकारे इतरांनाही धमकावण्यात आले होते का, याचा तपास ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस करत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सहपोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-१च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.