मोटरमनच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ
वसई: बुधवारी नालासोपारा आणि वसई रोड स्थानकादरम्यान एका तरुणाने थेट चालत्या लोकलसमोर येऊन ती रोखण्याचा अत्यंत धोकादायक प्रयत्न केला. या संपूर्ण धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण रुळावर ठाम उभा राहून लोकल रोखण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमधील मोटरमन आणि प्रवाशांनी त्याला वारंवार बाजूला होण्याचे आवाहन केले; मात्र, तो तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. सुदैवाने, मोटरमनने क्षणाचाही विलंब न करता तातडीने ‘इमर्जन्सी ब्रेक’ लावले आणि गाडी तरुणापासून अवघ्या काही अंतरावर थांबली. मोटरमनच्या या सतर्कतेमुळे भीषण अपघात टळला.
तथापि, तरुण बाजूला होत नसल्याचे पाहून शेवटी एका प्रवाशाने लोकलधून खाली उतरून त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला रुळावरून बाजूला खेचले. या संपूर्ण प्रकारामुळे काही काळ लोकल वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.