भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची तक्रार
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर विद्यमान दोन उपायुक्तांची सर्वसाधारण सभेच्या ठरावातून करण्यात आलेली शिफारस नियमबाह्य आहे. या संदर्भात महापालिकेने केलेला ठराव रद्द करून राज्य सरकारच्या नियमानुसार प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवड करावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठाणे महापालिकेच्या २३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळचे प्रकरण आणून घाईघाईत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त या पदावर पदोन्नतीने नियुक्तीसाठी दोन उपायुक्तांची नावे निश्चित करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त हे ठाणे महापालिकेतील महत्त्वाचे पद असून, हे रिक्त राहणे उचीत नाही. ही बाब विचारात घेता ३१ ऑगस्ट रोजी रिक्त होणाऱ्या पदावर या नियुक्त्या करण्याबाबतच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिली होती. सदर प्रस्ताव मान्यतेच्या पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणेस सर्वसाधारण सभा मान्यता देत आहे, असा उल्लेख ठरावात होता. मात्र, संबंधित ठराव हा संशयास्पद असून, नगरसेवकांना माहिती न देताच घाईघाईत मंजूर करण्यात आला, असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तपदावर निवडीने नियुक्ती करावयाच्या प्रस्तावावर विचार करण्यास्तव नियमावली निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठीचे प्रस्ताव विचारात घेण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष प्रधान सचिव (नगर विकास-२) असून, सदस्यपदी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय, ज्येष्ठतम महानगरपालिका आयुक्त (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून), संबंधित महापालिका आयुक्त, उपसचिव, तर सदस्यपदी अवर सचिव यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तपदाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता होती, अशी माहिती नारायण पवार यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्तपदावरील बेकायदेशीर नियुक्तीमुळे संबंधित प्रकरणाला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर या प्रकरणामुळे महापालिकेची अनावश्यक बदनामी होऊ शकेल. महासभेला अतिरिक्त आयुक्त पदाच्या बढतीचा अधिकार नसल्याने महासभेवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित ठराव हा विखंडित करावा. तसेच महापालिका संवर्गातून अतिरिक्त आयुक्त व उप आयुक्त पदावरील नियुक्तीसाठी नियमानुसार प्रक्रिया राबवावी, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.