ठाणे पालिका उपायुक्तांकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

ठाणे: ठाणे महापालिकेच्या उपायुक्त तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सक्षम प्राधिकारी मीनल पालांडे यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी एका पत्रकाराविरोधात चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची रक्कम देत नसल्याने पालांडे यांच्या मुलीकडे बघण्याची धमकीही त्याने दिली होती. या प्रकरणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सुहास शिंदे असे खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या पत्रकाराचे नाव असून त्याचे कार्यालय तीन हात नाका येथे आहे. ठाणे येथील पाचपखाडी भागात राहणाऱ्या मीनल पालांडे या ठाणे महापालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत आहेत. याशिवाय, त्यांच्याकडे ठाणे येथील मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागातील सक्षम प्राधिकारी या पदाचा पदभारही आहे. त्यांच्या या कायदेशीर नियुक्तीवर सुहास शिंदे हा शंका घेत होता आणि त्या संदर्भात तक्रारी तसेच बदनामीकारक अर्ज प्राधिकरणाकडे वारंवार करीत होता. तसेच त्याने त्यांना नोकरी घालविण्याची धमकी दिली होती. तसेच हा प्रकार थांबविण्यासाठी त्याने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयातील कार्यकारी अभियंता राजकुमार पवार यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच मीनल पालांडे यांचे परिचित असलेले मुश्ताक खोकर यांच्याकडे तडजोडीअंती १२ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, खंडणीचे पैसे देत नसल्यामुळे त्यांच्या मुलीकडे बघण्याची धमकी दिली. नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या ठाणे कार्यालयात हा प्रकार घडला. या प्रकरणी मिनल पालांडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे चितळसर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील वरुडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुहास शिंदे अद्याप अटक नसून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

माझ्या कायदेशीर नियुक्तीवर शंका घेऊन खोटे अर्ज करून बदनामी केली. तसेच पैसे दिले नाहीत म्हणून मुलीकडे बघण्याची धमकी दिली. तसेच माझ्या गाडीचे लोकेशनही काढल्याने माझ्या जिवाला धोका निर्माण झाला होता, अशी माहिती उपायुक्त मीनल पालांडे यांनी दिली.