एसटी स्मार्टकार्डसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

ठाणे : एसटी महामंडळातर्फे विविध सामाजिक घटकांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि विविध पुरस्कारार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येते. मात्र सध्या नोंदणीकरण व स्मार्टकार्ड टॉप अप प्रक्रिया सुरु आहे. याकरीता ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत स्मार्टकार्ड कार्यप्रणालीच्या काही तांत्रिक अडचणींमुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण प्रक्रिया बंद आहे. केवळ स्मार्टकार्ड नुतनीकरण व टॉपअप प्रक्रिया सुरु असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोेंदणीकरण व वितरण करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड तातडीने संबंधितांना वितरीत करण्याबाबत व आगारांमध्ये कोणत्याही लाभार्थ्यांचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही, अशा सूचना आगार  व्यवस्थापकांना देण्यात याव्यात, अशा सूचना विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, लेखाधिकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार आणि सर्व स्थानक प्रमुखांना एस.टीच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.