मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांच्या कामांचा घोटाळा उघडकीस
ठाणे : स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला मलनिस्सारण विभागातील काम मिळावे यासाठी सर्व नियम-कायदे धाब्यावर बसवून महापालिकेचे नुकसान करून अपात्र असलेल्या ठेकेदाराला काम देण्याचा घाट ठाणे महापालिकेतील मलनिस्सारण विभागात सुरु असल्याचे समोर आले आहे.
ठाणे महापालिकेने कोलशेत, माजिवडा आणि विटावा या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रामधील विविध कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून आलेल्या सहा निविदांमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या चार निविदाकारांना बाद करून आपल्या मर्जीतील दोन ठेकेदारांना पात्र करण्यात आले आहे. ज्या चार निविदाकारांना अपात्र ठरवून बाद केले त्याची कारणे देखिल मलनिस्सारण विभागाने स्पष्ट केली नसल्याचे लेखा विभागाने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. ज्या कंपनीला पात्र करण्यात आले आहे त्याचा अनुभवाचा दाखला देताना ज्या कोपरी बायो इंजि. प्रा. लि. कंपनीला काहीही संबंध नसताना त्यांच्याबरोबर काम केल्याचे दाखविण्यात आले आहे तसेच हे काम पूर्ण होण्याच्या अगोदरच अनुभवाचा दाखला देण्यात आला आहे. ज्या कंपनीला हा दाखला दिला आहे ती तारीख ५ सप्टेंबर २०२२ अशी आहे. त्या कंपनीचे काम १५ नोव्हेंबर २०२३ला पूर्ण झाले असताना अनुभवाचा दाखला मात्र सप्टेंबर २०२२चा देऊन ती कंपनी पात्र ठरविण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. अनुभवाचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या कंपनीचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे कागदपत्रे तपासल्यावरून स्पष्ट होत आहे. पात्र करण्यात आलेली कंपनी ३०डिसेंबर २०२२साली नोंदणीकृत झाली असताना तिला अनुभवाचे एक महिना अगोदरचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
अनुभव आणि कंपनीची उलाढाल कमी असतानाही त्या कंपनीला पात्र ठरवून त्या ठेकेदाराला काम देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. टेंडर समितीने कागदपत्रे कटाक्षाने त्रयस्थ व्यक्तीकडून तपासून घेऊनच हे काम द्यावे त्यामुळे महापालिकेचे करोडो रुपये वाचतील असे तज्ञांचे मत आहे.
ठाणे महापालिकेच्या मल प्रक्रिया केंद्राकडे सर्वसामान्य ठाणेकर आणि जागरूक ठाणेकर सहसा लक्ष देत नसल्याने या विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याचे बोलले जात आहे. या विभागातील काही अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असून ठाणे शहराचे आ. संजय केळकर यांनी देखिल अशा एका प्रकरणाबाबत विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्याचा त्यांनी पुन्हा पाठपुरावा करावा, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.
याबाबत आ. केळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि पालिकेतील कुठल्याच अधिकाऱ्यावर कारवाई केली जात नाही. मलप्रक्रिया केंद्राचा अहवाल अजूनही दिलेला नाही. अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालय महापालिकेला दंड ठोठावत आहे. तरी देखिल महापालिकेचे डोळे उघडत नाहीत, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारून अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्या तोंडाला यापुढे काळे फासावे लागेल, अशी संतप्त भावना आ. केळकर यांनी व्यक्त केली.