आमदार संजय केळकर यांच्यासमोर रहिवाशांनी समस्यांचा वाचला पाढा
ठाणे: ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात वर्तकनगर येथील रेंटल हाऊसिंगच्या इमारतीत घरे देण्यात आली असून मुलभूत सुविधांअभावी नशिबी वनवास आल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे. आज त्यांनी आमदार संजय केळकर यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.
वर्तकनगर एमएमआरडीए दोस्ती हाऊसिंग रेंटल इमारतीमधील रहिवाशांच्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी या इमारतीची पाहणी केली. ठाणे महापालिकेतील सफाई कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात येथे घरे देण्यात आलेली आहेत. या इमारतीची दुर्दशा पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.
इमारतींमध्ये नियमितपणे पिण्याचे पाणी मिळत नाही, पाणी गळती, ड्रेनेज पाईप फुटल्याने दुर्गंधी, अस्वच्छता अशा अनेक तक्रारी रहिवाशांनी यावेळी मांडल्या. लिफ्टची दुरावस्था असल्याने ज्येष्ठ नागरिकांना जिन्याने चालत जावे लागते. भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यताही रहिवाशांनी व्यक्त केली.
श्री.केळकर यांनी तातडीने
संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सात दिवसांत या समस्या सोडविण्याच्या कडक सूचना केल्या. यावेळी स्थानिक रहिवासी तसेच पदाधिकारी दयाशंकर यादव, निलेश पाटील, शुभांगी खांडेकर, नयना भोईर, विद्या शिंदे, मंगल कडू, महापालिका कार्यकारी अभियंता अमृतकर, चारुदत सरूळकर, विद्युत विभागाचे राजू येडवे आदी उपस्थित होते.