मच्छीमार, शेतकऱ्यांची घरे क्लस्टरमधून वगळा

खा. राजन विचारे यांची मागणी

भाईंदर: क्लस्टर योजना राबवताना मिराभाईंदर शहरातील गावठाण भाग, समुद्र किनारपट्टीवर असलेले मच्छीमारांचे कोळीवाडे, शेतकऱ्यांची घरे आणि गावे यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा. मच्छीमार आणि शेतकऱ्यांची घरे आणि गांवे यांना क्लस्टरमधून पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी मीरा-भाईंदरचे महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने खा. राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी विचारे यांनी शहरातील विविध विकासकामांवर चर्चा केली. शहरातील शासकीय जमिनीवर असलेल्या घरांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमीअभिलेख विभागाकडून सर्व्हे सुरू झाला आहे. या घरमालकांना २००० पूर्वीचे वास्तव्याचे पुरावे जमा करण्यास सांगण्यात आले आहेत. पुरावे जमा न केल्यास बांधकामांवर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. हा मुद्दा विचारे यांनी उपस्थित केल्यानंतर आयुक्त यांनी स्पष्ट केले की, नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही. ज्यांची घरे पूर्वीपासून आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. शिवसेनेच्या शिष्टमंडळात उपनेते विनोद घोसाळकर, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, धनेश पाटील, जयराम मेसे, शांताराम ठाकूर, तारा घरत आदी उपस्थित होते.