ठाणे महापालिकेने दिली माहिती
ठाणे: कळवा प्रभाग समिती क्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर या प्रभाग समिती क्षेत्रात आजही २५ अनधिकृत बांधकामे सुरु असल्याची कबुली द्यावी लागली आहे.
काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी माहिती अधिकारात ही माहिती प्रशासनाकडून मागितली होती. कोरोना काळापासून शहरातील अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा गाजत आहे. याच अनधिकृत बांधकामांवरुन १४ आजी, माजी सहाय्यक आयुक्तांची चौकशी लावण्यात आली आहे.
दरम्यान चव्हाण यांनी मुंब्रा आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी देखील माहिती अधिकारात मागितली आहे. महापालिकेने ही यादी दिल्यानंतर या बांधकामांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती चव्हाण यांनी मागितली आहे. तसेच याला दोषी असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महापालिकेने दिलेली नावेही बोगस?
महापालिकेने चव्हाण यांना दिलेली २५ अनधिकृत बांधकामातील जी नावे देण्यात आली आहेत, त्यातील अनेक नावे खोटी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेकडून अशी खोटी यादी का देण्यात आली, यावरुन देखील आता चर्चा सुरु झाली आहे.