नोटीसीनंतरही ३२ ओव्हरसाईज होर्डिंग्स ताठ मानेने उभ्या

ठाणे: घाटकोपर होर्डिंग्सच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने शहरातील ३२ ओव्हरसाईज होर्डिंग्सला नोटीस बजावूनही हे महाकाय होर्डिंग्स अजूनही कायम असून ठाणेकरांवरील धोका अजूनही टळलेला नाही.

घाटकोपरची दुर्घटना घडल्यानंतर ज्या २९४ होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या त्यापैकी जवळपास २०० होर्डिंग मालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले आहे. मात्र ओव्हरसाईज होर्डिंग शहरात तसेच असल्याने ३२ होर्डिंग्सला महापालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीमध्ये महापालिकेने ज्या आकाराच्या होर्डिंग्स उभारण्याची परवानगी दिली आहे त्याच आकाराचे होर्डिंग्ज उभारण्यात यावेत, अशा सूचना दिल्या होत्या. यामध्ये एमएसआरडीसी, रेल्वे आणि एस.टी महामंडळाच्या क्षेत्रात असलेल्या होर्डिंग्सची साईज कमी करण्यासंदर्भात देखील पत्र दिले होते.

एमएसआरडीसीच्या हद्दीत १८, एस.टी महामंडळाच्या हद्दीत दोन तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एक होर्डिंग असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र नोटीस देऊनही शहरात विनापरवाना असलेले हे महाकाय ओव्हरसाईज होर्डिंग तसेच असल्याचे समोर आले आहे. नोटीस बजावलेल्या एकाही जाहिरात एजन्सीने त्यांच्या होर्डिंग्जचा आकार कमी केलेला नाही. परिणामी ऐन पावसाळ्यात होर्डिंग्समुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

फ्लॉवर व्हॅलीजवळील धोकादायक होर्डिंग मंगळवारी संध्याकाळी उशिरा संबंधीत एजन्सीकडून काढण्यास सुरुवात करण्यात आली. घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.