* पालिका मुख्यालयातील नगरसेवक आवक-जावक नोंदवही गहाळ
* सात महिन्यापासून घेताहेत शोध
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराचा सावळागोंधळ असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. पालिका मुख्यालयातील नगरसेवक अवाक-जावक नोंदवहीच गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.
आयुक्तांच्या निर्देशानंतरही माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. माहिती न मिळाल्यास मनसे स्टाईलने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मनसे शाखा अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे.
ठाणे पालिका आयुक्त कार्यालयात नगरसेवक आवक-जावक नोंदवहीची माहिती आरटीआयमार्फत मागवण्यात आलेली होती. तब्बल सात महिने उलटले मात्र माहितीचा अधिकार कार्यकर्ता संतोष निकम यांना माहिती मिळालीच नाही. याबाबत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन सर्व प्रकार श्री. निकम यांनी सांगितला. त्यांनी त्वरित माहिती देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशही दिले. तरीही अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत होते.
आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याच्या निषेधार्थ श्री. निकम यांनी या टाळाटाळ विरोधात थेट कार्यालयाच्या बाहेर अनेक तास ठिय्या आंदोलन केले होते. यावेळीही माहिती देण्यासाठी आणखीन १५ दिवसाची मुदत मागूनही माहिती देण्यात आली नाही.
अधिकारी सात महिन्यापासून गहाळ रजिस्टरचा शोध घेत आहेत. उपायुक्तांची भेट घेण्यास सांगितले. भेट घेतली एक तास चर्चा केली. त्यानंतर सदर अधिकाऱ्याने माहिती देण्याऐवजी त्यांनी पुन्हा समस्या काय आहेत हे नमूद करून अर्ज सादर करण्यास सांगितले. पालिका अधिकारी वर्ग हे आयुक्तांना खरी परिस्थिती सांगत नाहीत, लपवाछपवी करतात आणि अधिकाऱ्यांना पालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतात असा आरोप श्री. निकम यांनी केला. आता निर्धारित वेळेत माहिती न मिळाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा श्री. निकम यांनी दिला आहे