पाचव्या निविदेनंतरही ठेकेदारांची नालेसफाई कामाकडे पाठ

ठाणे : ठाण्यातील नालेसफाईच्या कामाचलची तब्बल पाचवेळा निविदा काढूनही ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. केवळ वागळे आणि लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईला प्रतिसाद मिळाला असून उर्वरित सात प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईची कामे रखडण्याची चिन्हे आहेत.

पावसाळ्यात आपत्ती निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चून शहरातील नाल्यांची सफाई केली जाते. मात्र,यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेला शून्य प्रतिसाद मिळाल्याने वारंवार निविदा प्रक्रिया राबविण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे. दुसरीकडे २०२२-२३ या आर्थिक वर्षात नालेसफाईचे बिले मिळाली नसल्याने यंदा नालेसफाईचे काम करताना पैसे कुठून आणायचे असा प्रश्न ठेकेदारांना भेडसावत आहे. त्यामुळे यावर्षी नालेसफाईसाठी लागणारी यंत्रणा उभी करण्यासाठी ठेकेदारांकडे पैसेच नसल्याने निविदा भरायची कशी असा प्रश्न ठेकेदारांना पडला आहे.

केवळ वागळे आणि लोकमान्य -सावरकरनगर या दोन प्रभाग समितीमधील नालेसफाईच्या कामासाठी प्रतिसाद मिळाला असून उर्वरित सात प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईची कामे वेळेवर कशी सुरु करायची असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे.

दरवर्षी शहरातील नालेसफाईवर १० कोटी खर्च केले जातात. महापालिकेने यंदा नालेसफाईच्या बजेट १५ ते २० टक्के घट केली असून जीएसटीचा भार देखील कमी केल्याने या खेपेला नालेसफाईसाठी ५ ते ६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नाले सफाईची रक्कम कमी केल्याने ठेकेदार मंडळींकडून नाराजी व्यक्त होत असून परिणामी निविदा प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभत असल्याचे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.

शहरातील नाल्यांची स्थिती

ठाणे महापालिका क्षेत्रात ११७ किलोमीटर अंतराचे एकूण ३०६ नाले आहेत. मुंब्य्रात ३१ किलोमीटर लांबीचे ९२ नाले आहेत. कळव्यात ९ किलोमीटरचे ४७, रायलादेवीमध्ये १७ किलोमीटरचे ३७, वर्तकनगरमध्ये १९ किलोमीटर लांबीचे २५, मानपाडा १७ किलोमीटरचे २६, नौपाडा येथे साडेचार किलोमीटरचे २४, वागळे इस्टेटमध्ये ८ किलोमीटरचे २०, उथळसरमध्ये साडेसात किलोमीटरचे २४ आणि कोपरीत ४ किलोमीटर लांबीचे ११ नाले आहेत.