शिवरायांचे स्मारक माळशेज घाटाच्या पायथ्याशी उभारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

मुरबाड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात न उभारता छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या रस्त्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या माळशेज घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावाजवळ उभारावे, अशी मागणी करचोंडे येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश घरत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

घाटघर-जुन्नर-पैठण असा व्यापारी मार्ग इसवी सन पूर्व शतकात होता. या भागामध्ये नाणेघाट, माळशेज घाट, सिद्धगड, गोरक्षगड, कळसुबाई शिखर, गणेश लेणी, भैरवगड असा ऐतिहासिक ठेवा या भागामध्ये आहे. तसेच ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आदिवासी ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी व येथील शेतकरी, तरुण यांना पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक या भागात उभारून या भागाच्या विकासाचा सेतु बांधावा, अशी मागणी या पत्रातून रमेश घरत केली आहे.

सध्या प्रस्तावित असलेला कल्याण-मुरबाड या रेल्वे मार्गाचा विस्तार सावर्णे या गावापर्यंत माळशेज घाटाच्या पायथ्यापर्यंत करावा, अशीही मागणी रमेश घरत यांनी केली आहे. नरिमन पॉईंट येथील व राजभवनापासून दीड किलोमीटर अंतरावर सोळा हेक्टर परिसरात एका खडकावर स्मारक बांधण्याचा तीन हजार सहाशे करोडचा भव्य प्रकल्प मंजूर करण्यात आला. तशा स्वरूपाचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. हे स्मारक अडीच हजार वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या कल्याण-मुरबाड-वैशाखरे या मुख्य रस्त्यालगत बांधुन शिवभक्तांच्या भावनांचा आदर केल्यास हिच खरी छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरेल, असे मत घरत यांनी पत्रात व्यक्त केले आहे.