जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

ठाणे : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा आरंभ बुधवारी झाला. प्रत्येक शाळेने आपापल्या स्तरावर विद्यार्थांचे हटके स्वागत करत दिवसभर विद्यार्थांच्या आवडीचे खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे जिल्हा परिषदेच्या काल्हेर शाळेत उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय विद्यार्थांना शालेय पुस्तकं, गणवेश देत स्वागत केले. यावेळी संवाद साधताना, डॉ. दांगडे म्हणाले की,  विद्यार्थांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करतानाच विद्यार्थी हा देशाचा सुजाण नागरिक घडेल अशा पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थावर संस्कार करावेत. यावेळी ६०० हून अधिक पटसंख्या असणाऱ्या काल्हेर शाळेचे डॉ. दांगडे यांनी कौतुक केले. तसेच पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या काल्हेर शाळेला आवश्यक भौतिक आणि शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. दांगडे म्हणाले. यावेळी  जिल्हा परिषद सदस्य यशवंत पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर निपुर्ते, श्री. मते, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थांना मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक  देण्यात आली. काल्हेर शाळेत  प्रातिनिधिक स्वरूपात  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते विद्यार्थांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आले. विशेष  म्हणजे अंशतः दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थांना त्यांना अपेक्षित असणारी पाठ्यपुस्तक देण्यात आली.

जिल्हा परिषद शाळाबरोबरच जिल्हातील महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही मोठ्या आनंदात आणि उत्साही वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.  जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या १६२० शाळा आहेत. या प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षण विभागाने दिले होते. त्याप्रमाणे सर्वच ठिकाणी  प्रवेशोत्सव साजरा झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी शहरातील सावित्राबाई थिराणी शाळेत उपस्थित राहून विद्यार्थांचे स्वागत केले.