आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा चौथा संघ कुठला असेल हे अजूनही निश्चित नाही. उद्या शेवटचा साखळी सामना खेळला जाईल परंतु आजच्या सामन्यानंतर हे नक्की होईल कि पाकिस्तान आणि न्यूझीलंड पैकी कोणी तरी एक उपांत्य फेरीत पोहोचणार आणि भारताशी खेळणार.
११ नोव्हेंबर रोजी कोलकता येथील ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानची लढत होणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. मात्र, त्यांना ज्या फरकाने इंग्लंडला हरवायचे आहे, ते कोणत्याही अर्थाने सोपे नाही. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना २८७ किंवा त्याहून अधिक धावांच्या फरकाने विजय मिळवावा लागेल आणि दुसरी फलंदाजी केल्यास त्यांना २.४ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. कागदावर काहीही शक्य आहे, पण क्रिकेट हे कागदावर नाही तर मैदानावर खेळले जाते हे आपणा सर्वांना माहीत आहे.
पाकिस्तानसाठी या सामन्याचे दावे खूप उंचावले असताना, इंग्लंड देखील या सामन्याला गांभीर्याने घेईल कारण जर ते या सामन्यात विजयी झाले तर २०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्यांची पात्र होण्याची शक्यता बळकट होईल.
इंग्लंड आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
इंग्लंड आणि पाकिस्तान १९७४ ते २०२१ दरम्यान एकमेकांविरुद्ध ९१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी इंग्लंडने ५६ जिंकले आहेत, पाकिस्तानने ३२ जिंकले आहेत आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात इंग्लंड आणि पाकिस्तानने प्रत्येकी एक जिंकला आहे. विश्वचषकात दोन्ही संघ १० वेळा आमनेसामने आले आहेत. पाकिस्तानकडे इंग्लंडविरुद्ध ५-४ अशी आघाडी असून एका सामन्याचा निकाल लागला नाही.
इंग्लंड | पाकिस्तान | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ६ | ४ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ५६ | ३२ |
भारतात | १ | १ |
विश्वचषकात | ४ | ५ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि पाकिस्तान त्यांचा नववा आणि शेवटचा साखळी सामना खेळणार आहेत. आठ सामन्यांपैकी इंग्लंडने दोन जिंकले आहेत, तर पाकिस्तानने चार जिंकले आहेत. इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडले असले तरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी त्यांना स्पर्धेचा शेवट जिंकून करायचा आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी आहे तथापि एक चमत्कारिक कामगिरीची गरज असेल.
सामना क्रमांक | इंग्लंड | पाकिस्तान |
१ | न्यूझीलंडकडून ९ विकेटने पराभव | नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव |
२ | बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव | श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव |
३ | अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी पराभव | भारताकडून ७ विकेटने पराभव |
४ | दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी पराभव | ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव |
५ | श्रीलंकेकडून ८ विकेटने पराभव | अफगाणिस्तानकडून ८ विकेटने पराभव |
६ | भारताकडून १०० धावांनी पराभव | दक्षिण आफ्रिकेकडून १ विकेटने पराभव |
७ | ऑस्ट्रेलियाकडून ३३ धावांनी पराभव | बांगलादेशचा ७ विकेटने पराभव |
८ | नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव | न्यूझीलंडचा २१ धावांनी पराभव (डीएलएस प्रणाली) |
संघ
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
दुखापती अपडेट्स
पाकिस्तानचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ बरगडीच्या दुखापतीने त्रस्त असून त्याला इंग्लंडच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
खेळण्याची परिस्थिती
कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. खेळ जसजसा पुढे जातो तसतशी खेळपट्टी संथ होत जाते. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊ शकते.
हवामान
हवामान सनी राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. २% ढगांचे आच्छादन आणि १% पावसाची शक्यता असेल. उत्तर-वायव्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
डेविड मलान: इंग्लंडच्या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने आठ सामन्यांत ४७ च्या सरासरीने आणि १०३ च्या स्ट्राईक रेटने ३७३ धावा केल्या आहेत.
आदिल रशीद: इंग्लंडच्या लेगस्पिनरने या स्पर्धेत आठ सामन्यांत १३ बळी घेतले. मधल्या षटकांमध्ये शिस्तबद्ध रेषा आणि लेन्थ गोलंदाजी करत त्याने धावांचा प्रवाह नियंत्रित केला.
मोहम्मद रिझवान: ७२ च्या सरासरीने आणि ९९ च्या स्ट्राईक रेटने सात डावात ३५९ धावा करून, उजव्या हाताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
शाहीन आफ्रिदी: पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या संघासाठी आठ सामन्यांत १६ विकेटसह सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. नव्या चेंडूने तो चांगली गोलंदाजी करत आहे.
आकड्यांचा खेळ
जो रूटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यासाठी ३८ धावांची गरज आणि विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी २६ धावांची आवश्यकता आहे
जोस बटलरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ६६ धावांची गरज आहे
डेविड मलानला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८१ धावांची गरज आहे
आदिल रशीदला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
डेव्हिड विलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
फखर जमानला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९ धावांची गरज आहे
- ख्रिस वोक्सला विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक बळी घेणार्या इयन बॉथमच्या (३०) पुढे जाण्यासाठी १ विकेटची गरज आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ११ नोव्हेंबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: ईडन गार्डन्स, कोलकता
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)