अनेक वर्षे ठाण मांडलेल्या अभियंत्यांच्या अखेर बदल्या

ठाणे : प्रभाग समितीमध्ये अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कार्यकारी अभियंत्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये मुंब्रा येथे सुमारे दहा वर्षे कार्यरत असलेल्या अभियंत्यांचा समावेश आहे.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरात सुरू असलेल्या नागरी सुविधांच्या कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे. ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना केल्या होत्या, परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, त्यामुळे त्यांच्या आदेशाने नगर अभियंता सोनाग्रा यांनी मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता धनंजय गोसावी यांनी ठामपा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुख्यालयातील कार्यकारी अभियंता सुधिर गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे बीएसयुपी या विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. मुख्यालयातील कार्यकारी अभियंता भगवान शिंदे यांना मुख्यालयाची जबाबदारी सांभाळून त्यांना वागळे प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंतापदी बदली करण्यात आली आहे. महेश अमृतकर हे देखिल मुख्यालयात कार्यरत असून त्यांच्याकडे ती जबाबदारी कायम ठेवून त्यांची लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंतापदी बदली करण्यात आली आहे. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता महेश बहिरम यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे तर वागळेप्रभाग समितीचे विलास धुमाळ यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वर्षांनी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.