इंग्लंडच्या टॉम हार्टलीसाठी हे स्वप्नवत कसोटी पदार्पण होते. या 24 वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी आपल्या संघासाठी शानदार प्रदर्शन केले. त्याने सामन्याच्या चौथ्या डावात 62 धावा देऊन सात गडी बाद केले आणि इंग्लंडला भारताविरुद्ध 28 धावांनी महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. चौथ्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात हा सामना जिंकून इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दिवसाच्या सुरुवातीला इंग्लंडकडे 126 धावांची आघाडी होती. त्यांनी आणखी 114 धावांची भर घालून भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. ऑली पोप हा इंग्लंडसाठी स्टार परफॉर्मर होता कारण या धावसंख्येमध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता. त्याला दुहेरी शतक झळकवायची सुवर्ण संधी होती परंतु जसप्रीत बुमराहने (4/41) त्याला 196 धावांवर असताना तंबूत पाठवले. क्रीजवर असताना पोपने रेहान अहमदसोबत सातव्या विकेटसाठी 64 धावांची आणि आठव्या विकेटसाठी हार्टलीसोबत 80 धावांची उपयुक्त भागीदारी केली.
चौथ्या दिवशीच्या खेळपट्टीवर ज्याची बरीच झीज झाली होती त्यावर विजयासाठी 231 धावांचे आव्हान यजमानांसाठी सोपे नव्हते. कर्णधार रोहित शर्मा (39) आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीतील 42 धावांची भागीदारी आणि आठव्या विकेटसाठी श्रीकर भरत (28) आणि रविचंद्रन अश्विन (28) यांच्यातील 57 धावांची भागीदारी याशिवाय इतर भारतीय फलंदाजांकडून जास्त काही योगदान आले नाही. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली आणि सगळे विकेट्स त्यांनी पटकावले.
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेली पहिली कसोटी ही टेस्ट क्रिकेटमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी चांगली जाहिरात होती. दोन्ही संघांनी चारही दिवस प्रत्येक सत्रात जोरदार लढा दिला आणि आखिरकार जो संघ अधिक जास्ती खेळला त्याला विजय प्राप्त झाला.
या पाच सामन्यांची कसोटी मालिकेने नक्कीच दमदार वात केली आहे आणि ती जसजशी पुढे जाईल तसतशी ती आणखी चांगली होईल अशी अपेक्षा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 ते 6 फेब्रुवारीदरम्यान विशाखापट्टणममध्ये डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल.