तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेसाठी अतिक्रमणे हटवली

अंबरनाथ : कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे, त्यामुळे रेल्वे रुळांशेजारी असलेली अतिक्रमणे हटवण्यास सुरूवात झाली आहे.

आज सोमवारी अंबरनाथ पूर्वेच्या भीमनगर परिसरात रेल्वेच्या हद्दीतील झोपडपट्टीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन प्रशासनाच्या माध्यमातून रेल्वे पोलीस आणि शिवाजीनगर पोलिसांच्या बंदोबस्तात तोडक कारवाई करण्यात आली.

यादरम्यान बाधित झालेल्या पात्र झोपडपट्टीधारकांचे एमएमआरडीएच्या माध्यमातून पनवेल आणि शहाड याठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून झोपडपट्टी हटवण्यासाठी जेसीबीच्या साह्याने तोडक कारवाई सुरू झाली आहे. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे प्रशासनाने बाधित झोपडपट्टीधारकांना या कारवाईबाबत नोटीस बजावली होती. सोमवारपासून भीमनगर येथील झोपडपट्टी हटवण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली.