दहिसर-शिळफाटा मार्गावरची अतिक्रमणे लवकरच हटवणार

मुंबई-पुणे महामार्ग होणार अपघातमुक्त

कल्याण: जुन्या मुंबई पुणे महार्गावरील दहिसर ते शिळफाटा दरम्यान महामार्गालगत प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. यांमुळे तब्बल ३२ नैसर्गिक नाले बंद झाले असल्याने नाल्यांमधील पाणी महामार्गावर येऊन अपघातांची मालिका सुरु झाली आहे.

या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती. या नंतर बुधवारी ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली होती. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील, तहसीलदार युवराज बांगर यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली असून लवकरच कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या अतिक्रमणांवर आता हातोडा पडणार आहे. दहिसर ते शिळ फाटा दरम्यान असलेल्या ३२ नैसर्गिक नाल्यांचे पुनर्जिवीकरण करण्याचा निश्चय आमदार राजू पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले बंद असल्याने नाल्यांमधील पाणी हे पावसाळ्यात महामार्गावर येऊन अपघात घडत आहेत. तर भंगार माफियांकडून रासायनिक पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नाल्या सोडले जाते. यांमुळे १४ गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच हे रसायन मिश्रित पाणी १४ गावांमध्ये जात असल्याने विहिरी आणि बोअरवेलच पाणी देखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे १४ गावांची प्रदूषणा मधून मुक्तता आणि वाहनचालकांची अपघातांच्या गर्तेतून मुक्तता करण्यासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.

प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसीचे अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व प्रशासक, आयआरबी कंपनीचे अधिकारी यांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मनसेचे जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील अन्य जणांच्या उपस्थितीत शनिवारी महामार्गावरील समस्या या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. लवकरच महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्याचं आश्वासन तहसीलदार युवराज बांगर यांनी दिले आहे.

दरम्यान कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक कोंडीस अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत देखील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला होता. वाहतूक कोंडी होत असल्याने आणि शासनाच्या कामात अडथळा ठरत असलेली बांधकामे तोडण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.