शहापूर: पडघा वनक्षेत्रातील पडघा परिमंडळ अंतर्गत वनरक्षक व त्यांचे सहकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करुन भूमाफियांना वनजमिनींवर अतिक्रमण करण्यास सहकार्य केले जात असून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिपक चंदे यांनी उपवन संरक्षक, ठाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तक्रारीनुसार सर्वे नंबर १९३ धामणगाव येथे परप्रांतीय नागरिकांनी गॅरेज, हरियाणा-यूपी मेवान नावाचा ढाबा आणि पार्किंगसाठी वनजमिनीचा बेकायदेशीर वापर केला आहे. तसेच एका गोट फार्मसाठी वनजमिनीत भराव टाकून अनधिकृत रस्ता तयार करण्यात आला आहे.
दरम्यान जानवळ हद्दीत एका खडीमशीनसाठी वनजमिनीतून रस्ता बनवण्यात आल्याचा आणि सर्वे नंबर ६६ येळकुंद्रा येथे आर. के. इम्पायर या विकासकाला ४० फूट रुंदीचा आणि १०० मीटर लांबीचा काँक्रीट रस्ता करण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय धामणगाव येथे जय मल्हार ढाब्याच्या मागे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभारण्यात येत असून, या बांधकामासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे गरिबांसाठी किंवा आदिवासी वाड्यांसाठी वनविभाग रस्ते मंजूर करत नसताना मुंबई-नाशिक महामार्गालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी मुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित वन अधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली असून कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.