थकबाकीच्या मागणीसाठी एसटी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ठाणे: महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने ठाण्यातील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता त्वरित करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास प्रवासी वाहतुकीच्या सीजनमध्ये एसटीच्या चक्काजाम केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.

राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सोडवण्यात आल्या नाहीत. 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2024 या कालावधीतील कामगारांची ध्येय होणारे थकबाकी त्वरित द्यावी, 2016-20 या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतनवाढ कामगारांना लागू करताना घरभाडे भत्त्याचा दर एकतर्फी कमी केला, त्यामुळे कमी केलेल्या घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतन वाढीची वाढीव दराची थकबाकी त्वरित कर्मचाऱ्यांना अदा करावी, अशा विविध मागण्या यावेळी कामगारांच्या वतीने करण्यात आल्या.

या आंदोलनात केंद्रीय कार्याध्यक्ष तथा ठाणे विभागीय सचिव सुरेश बावा, ठाणे विभागीय अध्यक्ष मुकुंद मोरे, नंदकुमार देशमुख, अंकुश बिडकर, ऋषी पुरी, अमोल ढोरे, गीता काशीद, स्मिता उथळे, बाळासाहेब आतकरे आणि इतर पदाधिकारी, कर्मचारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे वंदना डेपोजवळील मुख्य कार्यालयासमोर बुधवार (ता.5) हे आंदोलन जेवणाच्या सुट्टीत करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलन करण्याकरता जेवणाच्या सुट्टीचा वेळ निवडल्याचे सुरेश बावा यांनी सांगितले.