ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे त्यांच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प उद्या सादर करणार असून यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सुरु असलेली विकासकामे ही शासनाच्या निधी आणि अनुदानावरच सुरु असल्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महापालिकेचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना आयुक्त अभिजीत बांगर यांच्या पोतडीतून काय मिळणार हे पाहणे या निमित्ताने महत्वाचे ठरणार आहे. आगमी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्याने ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ अथवा दरवाढ होणार नसल्याचे चित्र आहे. परंतु मुलभुत सोई सुविधांना प्राधान्य देतांनाच आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार असल्याची शक्यता आहे.
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश करण्यात आला नव्हता. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महापालिका आपली विस्कटलेली आर्थिक घडी स्थिरस्थावर करण्यासाठीच प्रयत्न करणार असल्याचेच दिसत आहे. हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने यावर्षीही कोणत्याही प्रकारची दरवाढ आणि करवाढ होणार नसल्याचे निश्चित करण्यात आले आहे. महापालिकेने आपल्यावरील दायीत्व कमी करण्यावर भर दिल्याने नवीन प्रकल्पांना हात घातला नसल्याचे दिसून आले आहे.
आता नव्या अर्थ संकल्पात खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ सुंदर साफसफाई केलेले शौचालये, शिक्षणाच्या विविध संकल्पना यात सीबीएससी शाळा सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तसेच आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कळवा रुग्णालयाचा कायापालट करण्यात येणार आहे.
आयुक्तांनी ठाणेकरांच्या नजरेतून अर्थसंकल्प तयार करण्याचे निश्चित केले असल्याने येथील वैद्यकीय सेवा, महापालिकेतील कामगार, सफाई कामगार आदींसह इतर बाबींवर देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अंतर्गत मेट्रोच्या कामाला देखील गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
स्वच्छ, सुंदर, निटनिटके ठाणे शहर ठेवण्यासाठी देखील विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच पाणी वितरण व्यवस्था मजबुत करण्यासाठी रिमॉडेलींग योजनेसह इतर योजनांना प्राधान्य दिले जाणार आहे. ठाणे शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे तलावांची निगा देखभाल योग्य प्रकारे ठेवण्याबरोबरच त्याच्या सौंदर्यीकरणात भर देण्याचा देखील विचार केला जाणार आहे.
शहर विकास विभाग आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये फारशी वाढ होताना दिसत नसल्याने गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या दोन विभागांना जे उद्दिष्ट देण्यात आले होते. तेवढेच उद्दिष्ट यावर्षी या विभागांना देण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. याशिवाय मालमत्ता कर विभागाची वसुली समाधानकारक असल्याने या विभागाच्या उद्दिष्टामध्ये देखील वाढ करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.