आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
ठाणे : आणीबाणीच्या कालावधीत बंदिवास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
बंदिवानांना पुन्हा मानधन सुरू करण्यासाठी आमदार डावखरे यांनी ५ जुलै रोजी पत्र पाठविले होते. त्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाल्यामुळे आणीबाणीतील बंदिवासांसाठी आज खऱ्या अर्थाने न्यायाचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डावखरे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय लोकशाहीवर १९७५ मध्ये आलेल्या आणीबाणीरुपी संकटावेळी लढा देणाऱ्या नागरिकांचा कायम सन्मान व्हावा, या दृष्टीकोनातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत जुलै २०१८ मध्ये आणीबाणीतील बंदीवानांना पेन्शन योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर सहा महिन्यांतच ही योजना बंद केली होती. हा निर्णय अत्यंत दुर्देवी, लोकशाही कायम ठेवण्यासाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा अपमान करणारा होता, असे नमूद करून आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ५ जुलै रोजी पत्र पाठविले होते. त्यात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्याच्या दृष्टीकोनातून आणीबाणीविरोधातील आंदोलनात सहभागी व्यक्तींचा सन्मान करण्याचे धोरण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय झाल्यामुळे आमदार डावखरे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.