ठाण्यात ईडी आणि केंद्र सरकारविरुद्ध एल्गार 

राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक

ठाणे –  केंंद्र सरकारकडून ईडीचा गैरवापर करीत विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे फलक हाती घेतले होते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्यावतीने शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईडी आणि केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आणि ईडी या तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. मोदी सरकार हाय हाय, ईडी झाली येडी, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मा. विरोधी पक्षनेते मिलींद पाटील, माजी  विरोधी पक्षनेत्या प्रमिलाताई केणी, प्रदेश चिटणीस सुहास देसाई, उथळसर प्रभाग समिती सभापती वहिदा खान, नगरसेविका अपर्णा साळवी, सुनिता सातपुते, अंकिता शिंदे, आरती गायकवाड, परिवहन सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राहुल पिंगळे,राजेश जाधव, रमेश इंदिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी आनंद परांजपे म्हणाले की, आता लढा सुरु झालेला आहे. ज्यावेळी ईडी अस्तित्वात नव्हती त्यावेळी घडलेल्या कृतीला आता लक्ष्य केले जात असेल तर त्यामध्ये राजकारण नाही का? ईडीच्या धाडी कोणाच्या घरावर पडणार आहेत हे भाजपवाल्यांना आधीच कळते. म्हणजेच ईडी ही भाजपकडून चालविली जाते हेच स्पष्ट होत आहे. नवाब मलिक यांच्या देशभक्तीवर आरोप करणार्‍या भाजपने आधी उत्तर द्यावे की, नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला बिर्याणी खायला पाकिस्तानात पंतप्रधान का गेले होते? नांदेड – मालेगावमधील बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग या भाजपच्या खासदार कशा झाल्या? कर्नल पुरोहितशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तांदोलन का केले? याची उत्तरे आधी भाजपवाल्यांनी द्यावीत नंतर मोदी सरकारचा कारभार देशहितासाठी एक्स्पोज करणार्‍या मलिक यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करावे, असा टोला परांजपे यांनी लगावला.

आजचे आंदोलन हे भाजपच्या दडपशाहीच्या विरोधातील आंदोलन आहे. सर्व सेक्युलर पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. दाऊदला फरफटत आणू, असे म्हणणारे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बैठक करतात.  या बैठकीला स्वत: दाऊद उपस्थित होता. असे असताना 30 वर्षांपूर्वीच्या काही घटना समोर धरुन नवाब मलिकांना खोट्या आरोपांखाली अडकविण्यात आले आहे. वास्तविक, दाऊद आणि आयएसआयसोबत भाजपनेच हातमिळविणी केली आहे, असे आरोप विक्रांत चव्हाण यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गटनेते नजीब मुल्ला यांनीही यावेळी भाजपवर जोरदार टीका केली. जे लोक विरोधात बोलतात त्यांना टार्गेट केले जात आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना पराभव दिसत असल्यानेच हे घाणेरडे राजकारण भाजपने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून सुरु केले आहे. जोपर्यंत भाजप संपणार नाही; तोपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे. नवाब मलिक हे निर्दोष असून ते मुस्लीम असल्यानेच त्यांना दाऊदचे नाव जोडण्यात आले आहे. प्रत्येकवेळी मुस्लीम नेतृत्व पुढे आले की त्यांना अडकविण्याचा भाजपचा हा प्रयत्न नेहमी असतो, अशी टीका मुल्ला यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीचे सदस्य, सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष, ब्लॉक, प्रभाग अध्यक्ष, कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.