छापील बिलेच हवीत
ठाणे : सध्याच्या डिजिटल युगात वीज ग्राहक ‘गो ग्रीन’चा पर्याय निवडतील, या दृष्टीने ही सेवा सुरू केल्यानंतर ठाणे, वाशी आणि पेण वीज मंडळाच्या अंतर्गत असलेल्या फक्त २८ हजार ग्राहकांनीच ‘गो ग्रीन’ पर्याय निवडला आहे. बहुसंख्या वीज ग्राहकांनी छापील देयकाला पसंती दर्शवली आहे.
वीज मंडळाच्या भांडुप परिमंडळातील अवघ्या एक टक्के ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ पर्यायाला स्वीकारले आहे, असे कळते.दरमहा १० रुपयांच्या सवलतीसह छापील बिलाऐवजी ‘ईमेल आणि एसएमएसद्वारे वीज देयके ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र या योजनेला भांडुप परिमंडळातील ठाणे, वाशी आणि पेण विभागातील हजारो ग्राहकांनी नाकारले आहे. ठाणे मंडळात १०,८६४, वाशी मंडळात १२,७५९ आणि पेण मंडळातील अवघ्या ५३८६ ग्राहकांनीच ‘गो ग्रीन पर्याय’ निवडला आहे.
महावितरणच्या भांडुप परिमंडळात एकूण २४,०७७ हजार वीज ग्राहकांपैकी फक्त १.१७ टक्के ग्राहकांनी हा पर्याय स्वीकारला आहे. वीज भरणा करण्यासाठी महावितरणने संकेतस्थळाद्वारे वीज देयक पाहण्याची आणि भरण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ‘गो ग्रीन’ योजनेत ग्राहकांना छापील देयकाऐवजी ईमेल आणि एसएमएसद्वारे वीज बिल मिळते. ही ग्राहकांनी स्वीकारली. त्यांना दरमहा फक्त तीन रुपयांची सवलत देण्यात येत होती. मात्र ग्राहकांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी डिसेंबर २०१८ पासून सवलतीची रक्कम १० रुपये करण्यात आली आहे. यानुसार वर्षाला १२० रुपयांची सवलत मिळते.
निवडक ग्राहक पर्यावरण संवर्धनाला हातभार लावतील अशी अपेक्षा महावितरणला होती, परंतु ‘गो ग्रीन’ योजनेला असंख्य वीज ग्राहकांनी अपेक्षेप्रमाणे फारसा प्रतिसाद दिलेला नाही. वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांची एकूण संख्या २४ लाख ७७,५२८ आहे आणि तब्बल २१ लाखांपेक्षा अधिक घरगुती ग्राहक आहेत.
ग्राहक संख्येच्या तुलनेत हे प्रमाण फक्त १.१७ टक्के असल्यामुळे ही योजना बंद करावी का, असा विचार महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांच्या पातळीवर सुरू आहे. कल्याण परिमंडळामध्ये ‘गो ग्रीन योजनेचा लाभ घेणा-या नागरिकांची संख्या जेमतेम ३० हजाराच्या आसपास आहे, अशी माहिती सूत्राने दिली.