टीएमटी आगारात येण्याआधीच इलेक्ट्रिक बसगाड्या झाल्या फेल

येत्या दिवाळीत १२१ बसगाड्यांच्या फेरनिविदा

ठाणे : ठाणे महापालिका परिवहनच्या ताफ्यात नव्या ८१ बॅटरी ऑपरेटेड इलेक्ट्रिक बस ताफ्यात येण्याआधीच तांत्रिकदृष्ट्या ‘फेल’ झाल्या आहेत. त्यामुळे येत्या दिवाळीत १२१ बसगाड्यांच्या फेरनिविदांचा ‘बाण’ सुटणार आहे. या सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

१२१ बसगाड्या आणण्यासाठी निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. यासाठी भारतातील प्रसिद्ध, सर्वमान्य अशोक लेलँड, हैद्राबादमधील ओलेक्ट्रा आणि कॉसिसी मोबिलीटी या कंपन्यांना आवतण देण्यात आले होते. मात्र कॉसिसी मोबिलीटी कंपनी बसचे उत्पादन बाहेरील देशाचे असून, या कंपनीच्या बसची चाचणी यशस्वी न झाल्यामुळे ही कंपनीच बाद झाली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हैद्राबादमधील ओलेक्ट्रा कंपनीच्या बसची चाचणी घेण्यात आली आहे. बसची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ती बस १८४ किलोमीटरपर्यंत धावते, असे निदर्शनास आले. मात्र बॅटरी एकदा चार्ज केल्यावर बस २०० किलोमीटर अंतर कापू शकली पाहिजे, अशी मागणी ठाणे परिवहनच्या संबंधित अधिका-यांनी ‘ओलेक्ट्रा’च्या संबंधित अधिका-यांना घातली आहे.

या बॅटरीवर धावणा-या बसेस्चा खर्च दीड कोटी रुपये आहे. तिचे आयुवर्षे १५ वर्षे असणार आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ही बस खरेदी करण्यासाठी ठाणे परिवहन विभागाला (टीएमटी) ४६ लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून मिळणार आहे. या बॅटरीवर धावणा-या बसगाड्यांमुळे वेगही वाढतो, इंधनांमुळे होणारे प्रदूषण आणि दैनंदिन दुरुस्ती करण्याचा खर्चही वाचतो, असे या अधिका-याने सांगितले.

ईलेक्ट्रिक बसगाड्या ‘टीएमटी’ला उपलब्ध झाल्यानंतर त्या संपूर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील प्रवाशांच्या सेवेत येतील, असेही ते म्हणाले.