दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्षांना पत्र
ठाणे: कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे. यामुळे कल्याण लोकसभेत भाजप आपला उमेदवार उतरवणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दिवा भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरचं लढवावी यावर एकमत झाले. या बैठकीला भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मंडळ अध्यक्ष सपना भगत, अशोक पाटील, विनोद भगत, विजय भोईर, नरेश पवार, रोशन भगत, गणेश भगत आणि पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर दिवा शहरातील भाजप पदाधिकारींनी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना एक पत्र लिहिलं आहे.
कल्याण लोकसभेचा मतदार संघ हा भाजपसाठी पोषक वातावरण असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन, त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी, अशी आग्रही मागणी या पत्रात दिवा शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले की कल्याण लोकसभेत भाजपचे ३ आमदार आणि एक मंत्री आहे. तसेच कल्याण-डोंबिवली भाजपचा बालेकिल्ला आहे. कल्याण ग्रामीण, दिवा शहरात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते जोमाने काम करत आहेत. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अबकी बार ४०० पार’ हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कल्याण लोकसभेची निवडणूक कमळ या चिन्हावर लढवावी. कमळ हे चिन्ह घेऊव हे स्वप्न पूर्ण होईल. इतर कोणत्या पक्षाच्या चिन्हाने हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं भोईर यांनी पत्रात लिहिलं आहे.
दरम्यान, आता दिव्यातील भाजप पदाधिकारी यांनी ही भूमिका घेतल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. ठाणे लोकसभा असो किंवा कल्याण लोकसभेवर भाजप आपला दावा अद्याप करत असल्याचे दिसून आले आहे.