सदस्य निवडणूक स्थगित
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील फेरीवाला सदस्य पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या निवडणुकीला ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनेच स्थगिती देण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेनेच ११ एप्रिल रोजी ही निवडणूक जाहीर केली होती. मात्र मतदारांची यादी अद्ययावत न करताच २०१६ च्या मतदार यादीवर निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर नव्याने नोंदणी झालेल्या सदस्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नसता. प्रशासनानेच केलेली ही चूक प्रशासनाच्याच लक्षात आल्यानंतर अखेर या निवडणुकीला स्थगिती देण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर ओढवली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नगर पथ विक्रेता (फेरीवाला) समितीवरील आठ प्रतिनिधींच्या निवडणुकीची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली होती. २६ मार्च रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समिती कार्यालय तसेच ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रभाग समितीनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर ११ एप्रिल रोजी निवडणूक घेण्याचे जाहीर करून त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजिविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) नियम २०१६ नुसार ठाणे महापालिका पथ विक्रेता समितीमधील पथ विक्रेत्यांच्या प्रतिनिधींची नगर पथ विक्रेता समितीचे सदस्य म्हणून नोंदणीकृत पथ विक्रेत्यांमधून पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रबोधन मवाडे यांनी जाहीर केले होते.
समितीच्या निवडणुकीसाठी १३६५ मतदारांची यादी प्रकाशित करण्यात आली होती. मात्र आता या निवडणूक प्रक्रियेला प्रशासनाच्या वतीनेच स्थगिती देण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जी मतदारांची यादी जाहीर करण्यात आली होती ती यादी अद्ययावत नसल्याचे लक्षात आल्याने ही चूक लक्षात आल्याने प्रशासनाच्या वतीनेच अखेर या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
नियमाप्रमाणे मतदानाच्या तीन महिने आधी मतदारांची यादी अद्ययावत करणे आवश्यक आहे. तर मतदारांची नोंदणी करणे ही निरंतर प्रक्रिया आहे. मात्र प्रशासनाच्या वतीनेच याची पूर्तता करण्यात आली नसल्याने निवडणूक स्थगित करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
आठ जागांसाठी होणार होते मतदान
सर्वसाधारण गट (महिला राखीव) – ०३
अनुसूचित जाती (महिला राखीव) – ०१
अनुसूचित जमाती – ०१
इतर मागास वर्ग – ०१
अल्पसंख्याक – ०१
विकलांग व्यक्ती (महिला राखीव) – ०१
एकूण जागा – ०८
प्रभाग समितीनिहाय मतदार (अद्ययावत नसलेली यादी )
प्रभाग समिती पुरुष महिला एकूण
माजिवडा-मानपाडा – ८५ २४ १०९
वर्तक नगर – १४३ ३९ १८२
लोकमान्य नगर-सावरकर नगर – १३५ ३९ १७४
वागळे – ९४ १४ १०८
नौपाडा – कोपरी – २७६ ६५ ३४१
उथळसर – १६५ ७२ २३७
कळवा – ६२ २८ ९०
मुंब्रा – ७२ १७ ८९
दिवा – ०८ २७ ३५
एकूण – १०४० ३२५ १३६५