काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी
नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचे राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (२६ जून) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आता सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. काँग्रेसने व्हिप जारी करत बुधवारी सर्व खासदारांना संसदेत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तीन ओळीचा हा व्हिप असून काँग्रेस पक्षाच्या सर्व खासदारांना उद्या सकाळी ११ वाजता सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपासून ते संसदेचे कामकाज संपेपर्यंत सभागृहात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकसभेत उद्या महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, त्यासाठी काँग्रेसच्या सर्व खासदारांनी संसदेत उपस्थित राहावे, असा व्हिप जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी एनडीए आणि विरोधकांमध्ये एकमत झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, इंडिया आघाडीकडून उपाध्यक्षपदासाठी आग्रह धरला. मात्र, उपाध्यक्षपद देण्यास एनडीएने नकार दिल्यामुळे इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आला आहे.
उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिघाडी?
लोकसभा अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांना उमेदवारी देण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षांच्या उमेदवारीवरून इंडिया आघाडीत बिनसलं असल्याची चर्चा रंगली आहे. तृणमूलच्या भूमिकेमुळे पहिल्याच अधिवेशनात इंडिया आघाडीत बिघाडी सुरु झाल्याची टीका होऊ लागली आहे.