ठाणे: जमिनीच्या वादातून मोठ्या भावाचा सुपारी देऊन खून करणाऱ्या लहान भावाला ठाणे ग्रामिण पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून कोणतेही धागेदोरे हाती नसतानाही ग्रामिण पोलिसांनी अतिशय क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविले आहे.
नरेश पाटील (३७) असे अटक करण्यात आलेल्या छोट्या भावाचे नाव आहे. १२ मे रोजी भिवंडी येथिल गणेशपुरी पोलिस ठाण्यात मोठा भाऊ परेश पाटील (४०) हा वसई येथे दुचाकीवरून जात असताना अज्ञात व्यक्तींनी शेडगाव ते शेडगाव फाटा दरम्यान त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून झाल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामिण पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी घटना स्थळाला भेट देऊन तपास करण्याचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार ठाणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा तसेच गणेशपुरी पोलिस समांतर तपास करत होते. या तपासा दरम्यान पोलिसांनी दोनशे सीसी टीव्ही कॅमेरे तपासून गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेल्या गाडीचा क्रमांक मिळवून राकेश पाटील (३७) प्रेमजीत घरत (३८) दक्षात भोईर (२४) हे सर्व रा. केळवा पालघर या तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला असून मयताचा लहान भाऊ नरेश पाटील याने भावाला ठार मारण्याची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांना दिली. त्या आधारे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
ग्रामिण पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, गणेशपुरी विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी राहुल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते, गणेशपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम, रोहन शेलार, भाऊसाहेब गायकवाड, शरद सुरळकर, उमेश खिराड, मयूर पाटील यांचे पथक तयार करून हा गुन्हा उघडकीस आणला.