ठाणे: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार, अवैध साठेबाजी आणि बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी कृषी विभाग व पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या प्रमुख मार्गांवर विशेष चेकनाके उभारून संशयित वाहनांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना योग्य वेळी व योग्य दरात खत उपलब्ध व्हावे, तसेच कृषी उपयोगासाठी असलेले निमकोटेड युरिया खत इतर औद्योगिक वापरासाठी वळवले जाणार नाही यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. काही ठिकाणी युरिया खताची अवैध साठेबाजी, परराज्यात अथवा इतर जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर वाहतूक, जादा दराने विक्री आणि अनधिकृत वितरण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान कृषी विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी संयुक्तपणे वाहनांची तपासणी करून युरिया खत वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, परवाने, बिल व साठा यांची पडताळणी करणार आहेत. कोणत्याही वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात युरिया खत आढळल्यास संबंधित कागदपत्रांची शहानिशा केली जाईल. अनियमितता अथवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध असूनही काही घटकांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी प्रशासन विशेष दक्षता घेत आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल, जादा दराने विक्री किंवा अवैध साठेबाजी दिसून आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.